'फिरत्या चाकावरती' हॉलंड

'फिरत्या चाकावरती' हॉलंड


रायगडला रोपवे नुकताच झाला होता तेव्हाची गोष्ट. बरेचवेळा रायगड पायर्‍यांनी चढून गेलोच होतो. रोपवे सुरू झाल्यावर वाटलं की गडाची पश्चिमेकडची बाजू बघत बघत गड चढण्याचा अनुभव घेऊ. रोपवेच्या बाजूला रायगडाचा विस्तीर्ण कडा आहे. खालून वर पाहताना टोपी पडावी इतका उंच.


तारकर्लीला जात असलात तर स्कूबा डायव्हिंग कराच, किंवा रायगडला जाणार असाल तर टकमक टोकावरून सूर्यास्त बघाच, किंवा कॉलेजमधे असताना आम्ही म्हणायचो, की सीओईपीत गेलात तर बोटक्लबचा चहा प्याच. यात अजून एक अ‍ॅडिशन होऊ लागली आहे - युरोपला जात असलातर हॉलंडला नक्की जा आणि हॉलंडला गेल्यावर सायकलवर भटकाच!हॉलंडमध्ये भटकायला गेलो होतो तेव्हाची गोष्ट. अॅमस्टरडॅमला तीन चार दिवस म्युझियम्स आणि पार्क्स बघून कंटाळा येऊ लागला होता. रस्त्यावर रहदारी बघावी तर सायकल्सची संख्या चिकार! आणि मग डोक्यात कल्पना आली की सायकलवरून अॅमस्टरडॅम फिरण्याचा अनुभव घेऊ. अन् काय सांगू! त्या दिवशी जे सायकलवर बसलो, ते पुढचे सात दिवस पार अॅमस्टरडॅमहून निघण्यासाठी विमानतळावर जाईपर्यंत सायकलवरच फिरत होतो. वास्तविक मी तोपर्यंत माझ्या आयुष्यात कधीही नेमाने, सरावाने सायकल चालवलेली नव्हती. सायकलिंगसाठी लागणारा दमसास, चिकाटी, 'मसलपॉवर' वगैरे गोष्टी माझ्याकडे नव्हत्याच (आणि अजूनही नाहीत) पण सायकलची राजधानी म्हणून (bicycle capital of the world) जगभर ख्याती पावलेलं अॅमस्टरडॅम हे सायकलने फिरण्याची मजा काही औरच आहे - अगदी रोपवेने रायगडाचा अभेद्य कडा बघत बघत चढण्याइतकीच!